पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ढिसाळ कारभार; तळवडेतील अश्लील व्हिडीओ प्रकरणाचा तपास बदली झालेल्या हवालदाराकडे

914

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – हिंजवडीतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैगिंग अत्याचार झाल्याच्या घटनेचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा गुरूवारी (दि. २०) हवालदाराकडून महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. हा प्रकार ताजा असतानाच तळवडे येथील तरूणीचे अश्लील फोटो एका तरूणाने सोशल मिडीयावर व्हायरल करून तीच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आजच्या (शुक्रवार) “प्रेसनोट”मध्ये नमूद करण्यात आले. परंतू, या प्रकरणाचा तपास ज्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे त्या अधिकाऱ्याची बदली भोसरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिकनगरी म्हणून नावलैकिक आलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे टोळक्यांची हौदोसनगरी म्हणून चर्चिली जाऊ लागली. त्यामुळे, १५ ऑगस्ट २०१८ रोजी शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. परिणामी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये उभारण्यात आलेल्या पोलिस आयुक्तालयाची सुरूवात होऊन सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतू, अद्यापही पोलिसांना योग्य पद्धतीने नियोजन आखता येत नसून “पोलिस आयुक्तालय नवीन आहे, नियोजन करण्यास वेळ लागत असल्याचा दावा अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे”. मात्र, या ढिसाळ कारभारामुळे पोलिस आयुक्तालयाच्या अनंत चुका समोर येत असल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान, हिंजवडी येथील दोन अल्पवयीन मुलींवरील लैगिंग अत्याचार झाल्याच्या घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद हिंजवडी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र एवढा गंभीर गुन्हा असताना याचा तपास वाकड पोलिस ठाण्याचे हवालदार बी.जी. कण्हेकर यांच्याकडे असल्याचे नमूद केले होते. हे वृत्त प्रसाऱ माध्यमात प्रसिद्ध होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुम मधील कर्मचारी आणि अधिकारी यांची झाडाझडती घेवून यामध्ये दुरूस्ती करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास महिला सहायक निरीक्षक सपना देवताळे यांच्याकडे असल्याची नवीन प्रेसनोट पाठविण्यात आली.

ही घटना ताजी असतानाच लागोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तसाच प्रकार पहायला मिळाला. तळवडे येथील एका २३ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ एका तरुणाने तिच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले तसेच तिच्या मामाच्या फेसबुक अकाऊंटवर टॅग करुन तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आज (शुक्रवार) प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून पोलिस हवालदार उत्तम कदम यांचा उल्लेख आहे.

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी “पीसीबी न्युज”च्या वार्ताहाराने त्यांना संपर्क साधला असता त्यांची बदली भोसरी पोलिस ठाण्यात झाली असल्याचे त्यांनी अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय ही कंट्रोल रुममध्ये टाईपिंग करताना चूक झाली होती. ती निदर्शनास आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी “पीसीबी न्युज”शी बोलताना सांगितले. त्यामुळे, “लागोपाठ दुसऱ्या दिवशीही एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असून पोलिस अधिकाऱ्यांना याचे थोडे सुद्धा गांभीर्य राहिलेले नाही तर हे पोलिस आधिकारी गुन्हेगारांना काय आळा घालणार?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे पोलिस आयुक्तालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.