पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा स्वपक्षाच्या नगरसेवकांवरील विश्वास उडाला?; नगरसेवकांवर वॉच ठेवणारी वेगळी यंत्रणा कार्यरत

0
1067

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात स्वतः अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे उमेदवार असल्याने पवार कुटुंबांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यंदा काहीही करून मावळ काबिज करायचाच या इराद्याने प्रचाराला लागलेल्या राष्ट्रवादीने पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर “२४ तास वॉच” ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारली आहे. नगरसेवक आणि पदाधिकारी दररोज काय काम करतात यावर करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी प्रचंड वैतागले असून, पक्षाचा आमच्यावर विश्वासच राहिला नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. शेजारच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातही पक्षाचे पदाधिकारी दबावाखाली असल्याचे चित्र आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने मावळ मतदारसंघात ताकद पणाला लावली असून, स्वतः अजितदादा लढत आहेत, असे चित्र आहे. सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादीने यंदा काहीही करून मावळ मतदारसंघ काबिज करायचाच या इराद्याने प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. स्वतः अजितदादा प्रत्येक पक्ष, संघटना, विविध संस्था, समविचारी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी “वन-टू-वन” संवाद साधून नाराजी दूर करत आहेत. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी चांगली वातावरण निर्मिती करण्यात अजितदादांना काही प्रमाणात यश आले आहे.

दुसरीकडे स्वपक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यंदा दगाफटका करू नयेत, याची खबरदारी म्हणून अजितदादांनी वेगळी यंत्रणा कामाला लावल्याचे समजते. प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकारी दररोज काय आणि कशा प्रकारे प्रचार करतात, यावर स्वतंत्र यंत्रणेमार्फत करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी प्रचंड वैतागले असल्याचे त्यांच्याशी खासगीत बोलताना स्पष्ट होते. पक्षाचा आमच्यावर विश्वास नसल्यामुळेच अशा प्रकारच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आमच्यावर नजर ठेवण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे नगरसेवक व आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मागेपुढे करणारे एक-दोन नगरसेवक इतर कोणालाही त्यांना भेटू देत नसल्याचे चित्र आहे. अनेक दिग्गजांना देखील पार्थ पवार यांना भेटण्यासाठी आधी या एक-दोन नगरसेवकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे देखील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज असल्याचे समजते. पार्थ पवार यांच्या दरबारात केवळ हुजरेगिरी आणि चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांनाच मान मिळणार असेल तर निवडणुकीत त्यांच्याकडूनच पक्षाने मते घ्यावीत, अशा भावना ते व्यक्त करत आहेत. शेजारच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी दबावाखाली काम करत असल्याचे चित्र आहे.