पिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाढवा उत्साहात साजरा; मराठी नववर्षाचे मंगलमय स्वागत    

0
649

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त  उत्साहाचे वातावरण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या मंगलदिनी निगडीतील यमुनानगर येथे पारंपारिक शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पारंपारिक वेष परिधान करून तरुणाई  सहभागी झाली होती.

रस्त्यांवर मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.  पारंपारिक वाद्ये ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या.  त्याचबरोबर सोशल मीडियातून गुढी पाडव्याच्या शुभेच्छांचे संदेश फॉरवर्ड  केले जात   आहेत.  निगडीतील यमुनानगर येथे भारतीय संस्कृती मंचाच्या यमुनानगर शाखेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. यात शालेय मुलांसह ढोल, लेझीम पथक सहभागी झाले होते.

शहरात मराठी नववर्षानिमित्त  विविध सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर फगवा फेटा अशा पेहरावात  महिलासह तरूणी शोभायात्रेत सहभागी झाल्या आहेत. शोभायात्राच्या प्रमुख मार्गावर मोठ्या रांगोळ्याही काढण्यात आल्या  आहेत. सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेऊन जनजागृती केली जात आहे.

झाडे लावा, पाणी वाचवा, असे संदेश देणारे फलक झळकत आहेत. लहान मुले हातात भगव्या पताका घेऊन ध्वजपथकात  दिमाखात चालत आहेत. तसेच घोड्यावर स्वार झालेल्या तरूणींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर अनेक शोभायात्रांमध्ये मतदारांसाठी जनजागृतीबाबतचे संदेश देणारे फलकही दिसून आले.