‘पालकमंत्रिपद गेले असले, तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही’

0
108

पुणे, दि. ८ (पीसीबी)- पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांची नियुक्ती झाली असली, तरी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘पालकमंत्रिपद गेले असले, तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही,’ या शब्दांत पाटील यांनी आपल्या समर्थकांची समजूत काढली आहे.

पाटील यांनी गुरुवारी आयोजित आढावा बैठकांमध्ये आपण आगामी काळातही बैठका घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. ‘आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत,’ असेही त्यांनी उपस्थितांना बजावले. त्यानुसार दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. या आमदारांनाही त्यांनी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगितले.

पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून हटविल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी असून ‘ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांनाच पदे मिळणार असतील, तर यापुढील काळात जिल्ह्यात पक्ष वाढणार कसा,’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा सुरू होती. पाटील यांना पालकमंत्रिपदावरून हटविण्याबाबत भाजपमधून मोठा विरोध होता. पवार यांनी आपल्या गृहजिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यात बाजी मारल्याने शहर भाजपमध्येही अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांशी चर्चा करताना पाटील यांनी त्यांनी आपली कार्यपद्धती ‘जैसे थे’च राहणार असल्याचे नमूद केले. पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे सुरू केलेले कार्यालय, त्यांच्याकडे असलेला कर्मचारी वर्ग तसाच राहणार आहे.

लवकरच राजकीय घडामोडींना वेग’
‘दर दोन महिन्यांनी आढावा बैठका आयोजित करून भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. रविवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असतील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत केंद्रीय मंत्री, पदाधिकारी सातत्याने पुण्यात येणार असून, लवकरच विविध घडामोडींना वेग येईल,’ अशी माहितीही पाटील यांनी सहकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.