‘पार्थ पडले, रोहित चढले’; शिवसेनेकडून रोहित पवारांचे कौतुक

0
684

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान पंतप्रधान  मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही  मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले.  त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणाला मोदी यांनी मान्यता दिली,  असे सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या टीकेला  प्रत्युत्तर दिले. 

सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ५० वर्षांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असा प्रश्न केला होता.  यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शहांना उत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये  रोहित पवार यांचे कौतुक केले आहे.  तसेच अप्रत्यक्षरित्या  शहा यांना टोलाही लगावला आहे.

पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. चौथ्या पवारांनी तीर मारताना आता सांगितले की, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसऱ्या पक्षात गेले, असे चिरंजीव रोहित म्हणतात. हे पीठ राष्ट्रवादीचे खरंच होते काय? ते काही असो. सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात आयाराम गयारामांचे पीक जोरात आले आहे. गयाराम कसले? फक्त आयारामांचाच जोर आहे. रावसाहेब दानवे हे अनेकदा मुद्द्याचे बोलतात. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रावसाहेबांनी कोपरखळी मारली. आयारामांची लाट पाहून दानवे म्हणाले, ”बाबांनो, इतकेही घुसू नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल.” दानवे म्हणतात ते खरेच आहे. आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात. काँग्रेस मृतवत होऊन पडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतकी भोके पडली आहेत की त्यांची चाळणी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील.

पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत.