Pune Gramin

पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

By PCB Author

October 15, 2022

चाकण, दि. १५ (पीसीबी) – सदनिकेची नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने पाच हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 14) दुपारी मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घडली.

राजाराम दामू रणपिसे (वय 55, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत बाळासाहेब ठाकूर (वय 26, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांनी सदनिका खरेदी केली होती. त्याची नोंद घेण्यासाठी व घरपट्टी जमा करून घेण्यासाठी ग्रामसेवक राजाराम रणपिसे याने पाच हजारांची लाच मागितली. फिर्यादींनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रणपिसे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.