पाकिस्तान लष्करप्रमुखांची गळाभेट राफेल करार नाही हे स्पष्ट झाले- सिद्धू

0
504

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याचे जाहीर केल्यानंतर पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. १५- १६ कोटी लोकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. किमान माझी गळाभेट ही राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गुरुवारी पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याची घोषणा केली होती. भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी कर्तारपूर मार्गिका बांधावी, अशी विनंती भारताने पाकिस्तानला केल्यानंतर काही वेळातच पाकने ही माहिती दिली होती. ऑगस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. भाजपाने यावरुन सिद्धूंवर टीकास्त्र सोडले होते. इतकेच नव्हे तर पंजाबमधील मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी देखील सिद्धूंच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट अखेर कामी आली. निदान ही गळाभेट राफेल करार नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. ‘२०१४ मधील मोदी लहर सर्वसामान्यांसाठी ‘जहर’ (विष) झाली. मोदी हे फक्त उद्योजकांच्या हातातील बोलके बाहुले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. २०१९ मध्ये मोदी लहर संपुष्टात येईल आणि राहुल गांधीच पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.