पवार यांच्या घरावरील हल्ला हे पोलिस यंत्रणेचे मोठे अपयश

0
419

कोल्हापूर, दि. ९ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेला धारेवर धरले आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. परंतु, ही घटना म्हणजे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते शनिवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सिल्व्हर ओकवरील एसटी कर्मचाऱ्यांच्या उग्र आंदोलनाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले की, मी कालच या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात असा हल्ला होणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील मुद्दे योग्य व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. सरकारनेही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.