पवना नदी संवाद यात्रेची उत्साहाने सुरूवात

0
343

सांगवी, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्र शासन, जलबिरादरी व पवना नदीसाठी काम करणार्‍या इतर सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर चला जाणूया नदीला अभियान राबवले जात आहे. ज्यात महाराष्ट्रातील जवळपास 109 नद्यांवर नदी संवाद यात्रांचे आयोजन केले जात आहे. त्यांपैकीच एक असणाऱ्या पवना नदीवर सांगवीतील पवना व मुळा संगमक्षेत्राजवळील संगमेश्वर मंदिराजवळ नावेतून पाण्याचे पुजन करुन नारळ अर्पण करुन या यात्रेचे उद्घाटन केले गेले.

यात्रेमध्ये विविध विद्याशाखांत शिक्षण घेणारे 30 विद्यार्थी सातही दिवस पूर्णवेळ पायी चालणार आहेत. या पदयात्रेचा मूळ उद्देश नदी, शासन व समाज यांमध्ये संवाद घडवून आणणे हा आहे. नदीची सद्यस्थिती व सातत्याने पूर व दुष्काळ यांची वाढत असलेल्या वारंवारितेला समजून घेणे, त्यासोबतच त्यांच्या

निराकरणासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील त्यांचा अभ्यास करणे असा हा उपक्रम आहे.
नदीला भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करणार्‍या युवकांचा एक गट तयार व्हावा, या हेतूने अभ्यासत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर स्मशानभूमी घाट येथे जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. नरेंद्र चुघ तसेच रोटरी कल्ब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक श्री. प्रदीप वाल्हेकर व अध्यक्ष श्री. गणेश बोरा यांनी व पिंपरी चिचवड जलसंपदा विभागातील अधिक्षक अभियंता जगताप मॅडम, कार्यकारी अभियंता श्री. विजय पाटील सर व कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र धोडपकर इ. उपस्थित होते.

इकोलॉजिकल सोसायटी, पुणे चे विश्वस्त डॉ. गुरूदास नूलकर यांचे अभ्याससत्र पार पडले. यात त्यांनी नदीची परिसंस्था व त्याचा आपल्या जीवनाशी असणारा थेट संबंध यावर मार्गदर्शन केले. यात्रेच्या पुढील प्रवासादरम्यान नटसम्राट निळू फुले सभागृहात सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू साळवे यांनी पवना नदीवर केलेल्या कामांचे अनुभव कथन केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्रही पार पडले.
ही पदयात्रा पुढील सात दिवसांमध्ये पवना नदीकाठच्या गावांमध्ये प्रवास करत नदीची सद्यस्थितीत तसेच नदी व लोकांचा सहसंबंध लोकसंवादातून जाणून घेईल. तरी सदरील पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.