पत्नीच्या मैत्रिणीने चोरलेल्या दागिन्यांचा हिंजवडी पोलिसांनी 24 तासात लावला शोध

0
203

हिंजवडी दि. १२ (पीसीबी) -पत्नीच्या मैत्रिणीने घरातून साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित महिलेला छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले. त्या महिलेने चोरलेले दागिने आपले आहेत असे सांगून एका व्यक्तीकडे ठेवण्यास दिले असल्याने त्या व्यक्तीकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दिपक कैलास ढोबळे (वय 36, रा. सुसगाव ता. मुळशी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी फिर्यादी दीपक यांच्या घरातून चार तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दीपक आणि त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता 5 फेब्रुवारी रोजी पत्नीची मैत्रीण त्यांच्या घरी आली होती.

दीपक यांच्या पत्नीची मैत्रीण परीक्षेसाठी पुणे शहरात आली होती. तिला राहण्याबाबत अडचण असल्याने ती दीपक यांच्या घरी राहण्यास आली होती. मात्र 5 फेब्रुवारी रोजी ती डोके दुखत असल्याचा बहाणा करून घरातून लवकर निघून गेली, असे पोलीस तपासात समोर आले. त्या महिलेवर संशय बळावल्याने हिंजवडी पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने दीपक यांच्या घरातून दागिने चोरी केले असल्याचे सांगितले. चोरलेले दागिने आपलेच आहेत असे सांगून तिने एका व्यक्तीकडे ठेवण्यासाठी दिले होते. हिंजवडी पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दोन लाख 82 हजार रुपये किमतीचे चार तोळे सात ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, मंगेश सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.