पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न

0
260

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – पत्नी आणि तिच्या एका साथीदाराने मिळून पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना महात्मा फुलेनगर एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीच्या गेटसमोर घडली.

उमाकांत विलास तपसाळे (वय 41, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची पत्नी (वय 29), अभिराम गायकवाड (रा. बावडा चौक, इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पत्नी यांच्यात वाद होत असल्याने मागील एक महिन्यापासून ते एकत्र राहत नाहीत. दरम्यान 25 जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी एमआयडीसीतील फुलेनगर येथून पायी जात होते. क्वालिटी पॅटर्न वर्कस कंपनीच्या गेट समोर आले असता आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तसेच, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या अंगावर डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.