पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची घोषणा

0
325
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण, पनवेल आणि खोपोली तीन सभा
  • संजोग वाघेरे यांना निवडून देण्याचे केले आवाहन

पनवेल, दि. ५ (पीसीबी) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण आणि खापोलीमध्ये सभा घेत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. गद्दारी करणा-यांना धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना संजोग वाघेरे पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संजोग वाघेरे-पाटील यांच्या पनवेल येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी गर्दी पाहून उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेची जागा आपणच जिंकत आलो असून ती आपणच जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, रायगड आणि मावळ… एका बाजूला छत्रपतींचं जन्मस्थान दुसऱ्या बाजूला छत्रपतींची राजधानी. छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा भगवाच फडकणार आहोत, दुसरं कुठलं फडकं आपण फडकवणार नाहीत.

गद्दारी करणा-यांचा समाचार घेताना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी गद्दारांना काय दिलं नव्हतं. जे देता येतं ते सगळं दिलं. तरीही तुम्ही आमच्या पाठीत वार केला. इथल्या गद्दार खासदाराची तरी काय ओळख होती. पण शिवसेना हे नाव घेऊन तो तुमच्यासमोर आला. म्हणून, तुम्ही त्याला दोन वेळा निवडून दिलं. पण, आता त्या गद्दाराला आणि सत्तेसाठी पक्ष बदलणा-यांनाही धडा शिकवावा लागणार आहे‌. तर, भाजप हा पक्ष नाही ही एक भ्रष्टाचारी, सडकी, कुजकी वृत्ती आहे. ही वृत्ती देशातून संपवावी लागेल. देशातून ही वृत्ती तडीपार करावी लागेल. तरच अच्छे दिन येतील, असा घणाघात देखील या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी केला.

‘अब की बार, भाजप तडीपार’ला तुफान प्रतिसाद

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या उध्दव ठाकरे यांच्या तीनही सभांमध्ये त्यांनी “अब की बार… भाजप तडीपार”. हा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या गर्जनेला जनतेने तुफान प्रतिसाद दिला. भाजप तडीपार… आयेगी इंडिया आघाडी सरकार असा उत्स्फूर्त गजर या सभांमध्ये पाहायला मिळाला. यावरून मावळ लोकसभेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय पक्का असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.

सर्वांच्या साथीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न तडीस लावू – संजोग वाघेरे

पनवेल येथील सभेत बोलताना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी एकही काम मतदारसंघात केलेले नाही. पनवेल शहरात पाण्याची समस्या आहेच, परंतु याठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रूग्णालय नाही. अनेक प्रश्न जैसे थे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जण काम करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघातील प्रश्न मार्गी तडीस लावू. माझ्वयाकडे मावळ लोकसभा मतदारसंघात संघटक म्हणून जबाबदारी दिली. ती जबाबदारी मिळाल्यानंतर आपण मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधला आहे. लोकसभेला मावळ लोकसभेमधून उध्दव ठाकरे यांच्याच विचाराचा उमेदवार निवडून येईल, असा निर्धार सर्वांनी केलेला आहे.