‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’मध्ये करोडोंचा घोटाळा उघड; पात्र ऐवजी ‘अपात्र’ शेतकऱ्यांनीच घेतलाय करोडोंचा लाभ

0
251

तामिळनाडू,दि.०८(पीसीबी) : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान किसान सन्मान’ निधी योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमधील १६ जणांना या योजनेमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

आतापर्यंतच्या तपासामध्ये कुड्डालोर, तिरुवन्नामलाई, विल्लुपुरम, सलेम, कल्लाकुरिची या जिल्ह्यांमध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे.या योजनेसाठी पात्र नसतानाही ४० हजार जणांना त्याअंतर्गत पैशांचे वाटप करण्यात आल्याची माहिती झालेल्या चौकशीदरम्यान समोर आली आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसताना सुद्धा या ४० हजार जणांना दर वर्षी सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

वर्षातून तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे वाटप ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत करण्यात येते. मात्र या प्रकरणात गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी अपात्र लोकांनाच मदत केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली आहे.