पंतप्रधान इम्रान खान बावळट आहेत; हीना रब्बानी यांची टीका

0
583

इस्लामाबाद, दि. २८ (पीसीबी) – भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. कलम ३७० रद्द करणे भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने सर्वच देशांना ठामपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर इम्रान खान सरकारने प्रयत्न करुनही पाकिस्तानला या प्रकरणामध्ये कोणत्याही देशाने थेट पाठिंबा दिलेला नाही. असे असतानाच आता इम्रान खान यांना पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी इम्रान खान बावळट असल्याची टिका केली आहे. रब्बानी यांनी केलेल्या या टीकेच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये कलम ३७० संदर्भात इम्रान खान सरकार देशाची भूमिका जगभरातील इतर देशांना पटवून देण्यास अयशस्वी ठरल्याची टीका करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधीपक्ष नेत्या रब्बांनी यांनी ‘इम्रान खान यांनी देशाला निराश करत आहेत. तुम्ही बावळट असाल तर तुम्हाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तुम्ही जाऊन प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांना सुनावले आहे. देशातील नागरिकांनी तुम्हाला मतदान करुन निवडून दिले आहे तर त्यांची निराशा करु नका. लोकांनी तुमचा मान ठेवावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुमचे काम तुम्हाला टाऊक नाही का?’ असे सवालही रब्बानी यांनी इम्रान यांनी संसदेत केलेल्या भाषणामधून विचारले आहेत.

रब्बानी यांनी इम्रान खान यांच्यावर केलेल्या या टीकात्मक भाषणाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानी सरकारमधील नेते केवळ भारताचा निषेध करत असून कोणताही कृती करताना दिसत नाहीत. पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या निषेधाचा काही फायदा होत नसल्याची टीकाही विरोधी पक्षांनी केली आहे.