पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा

0
299

अमृतसर, दि. १८ (पीसीबी) – शेतकरी आंदोलकांचे केंद्रस्थान असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले. सातपैकी सहा महापालिका जिंकणारा काँग्रेस पक्ष सातव्या महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, १०९ पैकी बहुतांश नगरपालिकांतही पक्षाने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपसह शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला. भटिंडा, होशियारपूर, कपूरथळा, अभोर, बाटला व पठाणकोट या महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. मोगा महापालिकेत या पक्षाला बहुमतासाठी सहा जागा कमी पडल्या. भटिंडा महापालिकेत ५३ वर्षांनी प्रथमच काँग्रेसच्या महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोगा, होशियारपूर, भटिंडा तसेच पठाणकोट या महापालिका पूर्वी अकाली-दल भाजप युतीकडे होत्या. आता दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. अकाली दल कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला आहे. अभोर, बाटला तसेच कपूरथला येथे प्रथमच महापालिका निवडणूक झाली. नगरपालिका निवडणुकीतही १०९ पैकी बहुतांश जागा जिंकत कॉंग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवला. एकूण १,८१७ प्रभागांपैकी कॉंग्रेसने १,१०२ प्रभागांमध्ये विजय मिळवला. शिरोमणी अकाली दलाने २५२़, आम आदमी पक्षाने ५१़, भाजपने २९, बसपने ५ प्रभागांमध्ये विजय मिळवला असून, इतर प्रभागांमध्ये अपक्षांनी बाजी मारली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसमध्ये या निवडणुकांच्या निकालामुळे नवचैतन्य पसरले आहे. या आंदोलनातील बहुतांश शेतकरी पंजाब व हरियाणातील आहेत. एका वर्षांवर येऊन ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुका पुन्हा जिंकून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. पालिका निवडणुकीत भाजपबरोबरच शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षाला फटका बसला. या निवडणुकीत आम आदमी पक्ष मोठय़ा ताकदीने उतरला होता. मात्र, या पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवण्यात आली.

भाजप, शिरोमणी आणि ‘आप’ यांसारख्या पक्षांच्या ‘नकारात्मक राजकारणाला’ जनतेने नाकारले आहे. आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढलो. या विजयामुळे अधिक परिश्रम करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी व्यक्त केली. भाजपचे वर्चस्व राहिलेल्या पठाणकोटमध्ये काँग्रेसने बाजी मारली. पठाणकोट महापालिकेत काँग्रेसने ५० पैकी ३७ जागा जिंकल्या. भाजपला केवळ ११ जागाच जिंकता आल्या. पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाबरोबर भटिंडा, होशियारपूरमध्ये असलेली सत्ताही भाजपने गमावली.