नेतेगिरी कामात दाखवा साहेब; भाजप नेत्याचा अजित पवारांना टोला

0
199

मुंबई, दि.१७ प्रतिनिधी : महाराष्ट्रावर करोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचंही पालन नागरिकांकडून होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाउनबद्दल भाष्य केलं होतं. लोकांनी दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन आणावा लागेल, असं मंत्रिमंडळातील सहकारी म्हणत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं.

अजित पवार यांच्या या विधानावरूनच निलेश राणे यांनी टीकास्त्र डागलं आहे. “अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.