“निर्यातीसाठीचा रेमडेसिवीर इंजेक्शन्स साठा केवळ महाराष्ट्रासाठी खुला केल्याने त्यापैकी पिंपरी-चिंचवडला ४०-५० हजार इंजेक्शन्स पुरविण्याची जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी”

0
464

पिंपरी, दि. १६ – राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने निर्यातीसाठी तयार असलेले व यापुढे उत्पादित होणारे रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर केवळ महाराष्ट्रात करण्यासाठी मान्यता मे. बी. डी.आर. फार्मा या कंपनीला दिली आहे. शासनाच्या या महत्वाच्या निर्णयामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा अतिरिक्त साठा आता उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. शासनाच्या निर्णयामुळे उपलब्ध होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सपैकी ४० ते ५० हजार इंजेक्शनचा पुरवठा पिंपरी चिंचवडला मिळावा. यासाठी मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने राज्य शासन व बी. डी.आर. फार्मा यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून सुमारे ११ लाख सक्रीय रुग्ण आजमितीला आहेत आणि यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. अचानकपणे वाढलेल्या रुग्णांमुळे रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक दारोदार फिरत आहेत. तसेच रेमडेसिवीरच्या विक्रीमध्ये मोठ्याप्रमाणात साठेबाजी, काळाबाजार देखील होऊ लागली. यावर उपाययोजना करण्यासाठी देशातील कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत केंद्र सरकारनं रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय 11 एप्रिल 2021 घेतला आहे. तसेच रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या उपलब्धते विषयीची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करावी. औषध नियंत्रकांनी रेमडेसिवीरच्या साठ्याची पडताळणी करावी आणि काळाबाजार होऊ नये यासाठी परिणामकारक कारवाई करावी व रेमडेसिवीरचं उत्पादन वाढवण्यासाठी औषध निर्माण विभाग उत्पादन कंपन्यांच्या सतत संपर्कात राहिल, असे महत्वाचे आदेश केंद्र सरकारने दिले.

बी.डी. आर. फार्मास्युटीकल्स इंटरनॅशनल प्रा.ली. या कंपनीच्या वतीने रेमडीसिवीर इंजेक्शनचे उत्पादन केले जाते. तसेच बी.डी.आर. फार्मा या कंपनीच्या वतीने उत्पादित करण्यात येत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन हे मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मे. बी. डी.आर. फार्मा या कंपनीच्या वतीने निर्यातीसाठी तयार असलेले व यापुढे उत्पादित होणारे रेमडेसिवीर इंजेक्शन वापर केवळ महाराष्ट्रात करण्यासाठी मान्यता दि. १६ एप्रिल २०२१ रोजी दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे उपलब्ध होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सपैकी ४० ते ५० हजार इंजेक्शनचा पुरवठा पिंपरी चिंचवडला मिळावा यासाठी मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने राज्य शासन व बी. डी.आर. फार्मा यांच्याकडे पाठपुरावा करावा. यासाठी कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे , अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.