नियमित वेतन सुरु करण्याकरीता मागितली तब्बल ९ लाखांची लाच; सापळा रचत ‘त्या’ महिला शिक्षणाधिकारीला अखेर अटक

0
405

नाशिक, दि.११ (पीसीबी) : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर ऊर्फ झनकर (44) यांच्यावर 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ठाणे एसीबीने कारवाई करुन शासकीय चालकासह एका शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांच्या शाळांच्या 20 टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरीता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार संस्थाचालकांनी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार सोपविली. या तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली असता त्यात लाच मागितली गेल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे ठरले. ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला.

तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी 8 लाख रुपयांची रक्कम स्वीकरण्यासाठी झनकर यांचा शासकीय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्री जिल्हा परिषदेत चौकशी व पडताळणी केली असता झनकर यांनी तडजोडीअंती 8 लाखांची रक्कम स्वीकारल्याचे मान्य करीत पुढील व्यवहार चालक येवलेसोबत करण्यास सांगितले होते. याप्रकरणी राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज दशपुते यांना या पथकाने ताब्यात घेतले आहे. झनकर यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.