निपाह विषाणूची लक्षणे आणखी ‘इतक्या’ लोकांमध्ये आढळली; मुलाच्या संपर्कात आलेले 30 आरोग्य कर्मचारी आयसोलेट

0
416

केरळ, दि.०७ (पीसीबी) : केरळच्या आरोग्य विभागाने निपाह व्हायरस संसर्गामुळे आपला जीव गमावलेल्या 12 वर्षांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या 251 व्यक्तींची ओळख पटवली आहे. यापैकी ३८ जण कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत आणि यातील 11 जणांना लक्षणे दिसली आहेत. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी सांगितले की, संपर्कात आलेल्या 251 लोकांपैकी 129 आरोग्य कर्मचारी आहेत. ते म्हणाले, कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 38 जण विलगीकरण कक्षात आहेत, त्यापैकी 11 जणांना संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत. आठ जणांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

संसर्गाची लक्षणे असलेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. संपर्कात आलेल्या 251 लोकांपैकी 54 उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत आणि त्यापैकी 30 आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामध्ये मुलाच्या पालकासह काही नातेवाईक आहेत. जॉर्ज म्हणाले, एनआयव्ही, पुणे येथील टीमने येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक विशेष प्रयोगशाळा उभारली आहे. यामध्ये, सोमवारी रात्रीपासून नमुन्यांची चाचणी केली जाईल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने मुलाचे घर आणि आसपासच्या परिसराचीही पाहणी केली. मंत्री म्हणाले,, मुलाच्या कुटुंबातील दोन शेळ्यांचे रक्त आणि सीरमचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था, भोपाळ येथेही तपासले जातील. जॉर्ज यांनी माहिती दिली की कोझिकोड तालुक्यात कोविड -19 लसीकरण मोहीम पुढील 48 तासांसाठी स्थगित ठेवण्यात आली आहे.