निगरगट्ट सरकारसाठी प्राणाची बाजी लावू नका, उपोषण सोडा – राज ठाकरे यांचे आवाहन

0
139

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा पेटले आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि राजकीय पक्ष, शासकीय कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. तिकडे अंतरवालीत मनोज जरांगे यांनी आपले दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत उपोषण सुरू करून सात दिवस झाले आहे. राज्य सरकारला मात्र अजूनही या मराठा आरक्षणावर उपाय सापडलेला नाही. जरांगे यांनी स्वतः मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही कायद्याच्या पदावर असलेल्या मंत्री, आमदार, खासदाराला गावबंदी केली आहे.

बेमुदत उपोषणाच्या दरम्यान जरांगे यांच्या भेटीला फक्त छत्रपती संभाजीराजे, शाहू महाराज छत्रपती हे अंतरवालीत आले होते. अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी धाव घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जरांगे यांची भेट घेऊन तिथे वस्तुनिष्ठ भाषण केले होते. तसेच जरांगे यांची मागणी वेगळी असल्यामुळे त्या संदर्भात काय करता येईल याची चर्चा आपण मुख्यमंत्र्यांशी करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी जरांगे यांना दिले होते.

दरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या आणि आता मराठ आरक्षणाचे आंदोलन या वळणावर येऊन ठेपले आहे. मनोज जरांगे सात दिवसांपासून उपोषण करत आहेत, अन्न-पाणी, वैद्यकीय उपचार ते घेत नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून खुले पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवतांनाच जरांगे यांना उपोषण सोडा, तब्येत जपा, अजून आपल्या पुढे खुप काम करायचं आहे, असे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचे हे पत्र जसेच्या तसे..

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,
सस्नेह जय महाराष्ट्र !
इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.

तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.
ह्यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही.

ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे.