निगडीत हॉटेलची तोडफोड करुन एकावर कोयत्याने वार

0
670

निगडी, दि. ५ (पीसीबी) – पाच जणांच्या टोळक्यांनी परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने दुकानदारांना शिवीगाळ करुन एका हॉटेलची तोडफोड केली. तसेच एकावर कोयत्याने वार गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निगडी यमुनानगर येथे घडली.

प्रितम सुरेश हजारे (वय २९, रा. समता हौसिंग सोसायटी, बिल्डिंग क्र.६, रुम नं. ६०७, अजंठानगर, चिंचवड) असे कोत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमर कसबे (वय २५), अमर उघडे (वय २५, दोघेही रा. दळवीनगर ओटास्किम, निगडी) आणि त्यांच्या तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी सुरेश हजारे आणि त्यांचे मित्र अमोल अहिरे हे दोघे यमुनानगर मिनी मार्केटजवळ बोलत उभे होते. यावेळी आरोपी अमर कसबे, अमर उघडे आणि त्यांचे तीन साथीदार तेथे आले आणि त्यांनी परिसरातील दुकानदारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केले. तसेच तेथील चावडी हॉटेलचे मालक आणि कामगारांनाही शिवीगाळ केली. तर प्रतिम यांना हॉटेलच्या खुर्चीने मारहाण करुन त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन हॉटेलमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अरदवाड तपास करत आहेत.