निंदनीय प्रकार! नांदायला तयार नसलेल्या पत्नीला पतीने केल विद्रुप; तक्रार करायला गेली तर पोलिसांनीसुद्धा उडवली खिल्ली

0
332

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – घरच्या भांडणामुळे नांदायला तयार नसलेल्या पत्नीला तिच्या पतीने बेदम मारहाण केलीच, पण धक्कादायक प्रकार म्हणजे पत्नीला विद्रुप करण्याच्या उद्धेशाने पतीने तिचे सुंदर केसही कापल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पतीकडून झालेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी जेव्हा पीडिता पोलीस स्टेशनमध्ये गेली तेव्हा पोलिसांनी तिला सहा तास थांबवून ठेवत पीडितेचीच खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमृता उर्फ कोमल वाल्हेकर असं या घटनेतील पीडितेच नाव असून पतीने आपले सुंदर केस कापून मारहाण केल्याच्या धक्क्यानं तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. ही घटना बुधवारी (४ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडल्याचं कोमलच म्हणणं आहे. आपला दारुडा पती आपल्याला मारहाण करत असल्याने मागील दोन वर्षांपासून आपण आईकडे राहत आहे. मात्र काल आपल्या पतीने आपल्याला एकट बघून गाठलं आणि ओढत घरी नेऊन मारहाण केली आणि केसही कापल्याच कैफियत पीडित कोमलने मांडली.

घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी कोमल पोलिसांकडे गेली. मात्र ती ज्या स्टेशनमध्ये गेली तेथील पोलीस कुणाचा तरी वाढदिवस करण्यात मश्गुल होते असंही कोमलनं सांगितलं. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली गेली नाही. तेव्हा पोलीस मुख्य स्टेशनला जाऊन तिने फिर्याद दिली आणि हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान कोमलला मारहाण करणारा तिचा पती नरेंद्र वाल्हेकर अजूनही मोकाट आहे.