नाशिक फाटा येथे कर्ज मंजूरकरण्याच्या बहाण्याने महिलेची ३० हजारांची फसवणूक

588

 

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – तीस लाखांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून दोघा जणांनी मिळून एका महिलेची तब्बल ३० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवार (दि.३ जुन) ते सोमवार (दि.४ जुन) दरम्यान नाशिक फाटा येथील हॉटेल अशोक कॉर्नर येथे घडली.

याप्रकरणी एका ५४ वर्षीय महिेलेने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अमोल पाटील आणि समीर आल्हाट (दोघेही, रा. शिवक्लासिक बिल्डींग, शिवाजीवाडी मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रविवार (दि.३ जुन) ते सोमवार (दि.४ जुन, २०१८) दरम्यान आरोपी अमोल पाटील याने फिर्यादी ५४ वर्षीय महिलेला फोन करुन तुमचे ३० लाखांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून नाशिक फाटा येथील हॉटेल अशोक कॉर्नर येथे बोलवले. तसेच ३० लाखांचे कर्ज मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. यावर महिलेने रोख ३० हजार रुपये अमोल याला दिली. यावेळी अमोल याचा मित्र समीर आल्हाट देखील तेथे उपस्थित होता. मात्र पैसे देऊन बराच काळ उलटून देखील आरोपी अमोल याने महिलेला ३० लाखांचे कर्ज मंजुर करुन दिले नाही. तसेच तिची ३० हजारांची रक्कम देखील परत केली नाही. यामुळे महिलेने अमोल आणि समीर या दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.