नारायण राणे, रामदास कदम यांची मराठा आंदोलकांनी काढली अंत्ययात्रा

0
204

धुळे,दि.३१(पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया धुळे शहरात उमटल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही अतिशय वास्तव मागणी आहे. त्यासाठी मदत न करता, त्यावर उपहास करणारे भाजपचे समर्थक अडचणीत आले आहेत. त्यांचा धुळे येथे निषेध करण्यात आला.

धुळे शहरात सोमवारी संतप्त मराठा समाजाच्या आंदोलकांनी उपहास करणाऱ्या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यांच्या प्रतिमेचे महापालिकेसमोर दहन करीत धिक्कार केला. राज्य शासन याबाबत अतिशय संथगतीने काम करीत असल्याने त्याचा निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. धुळे येथे मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे. राज्यभर मराठा आंदोलनाची धग सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्याबाबत सर्व थरातून नाराजी व्यक्त होत आहे.