नारायण राणेंच्या प्रवेशांचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेतल्यानंतरच- देवेंद्र फडणवीस

0
596

हिंगोली, दि. ३१ (पीसीबी)-  भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिला आहे. कारण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले आहे. स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना या विलिनीकरणासाठी तयार होणार का? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

गुरुवारी झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. सध्या नारायण राणे भाजपचे सहयोगी सदस्य असून राज्यसभेवर खासदार आहेत. भाजपमधल्या प्रवेशानंतर ते अधिकृत आणि औपचारिकरित्या भाजपवासी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा होईल.

राणे भाजपसोबत राहणार की नाही याचा निर्णय येत्या दहा दिवसात घेणार असल्याचे त्यांनी मागील आठवड्यात सांगितले होते. तोंडी परीक्षेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी नारायण राणेंना भाजपप्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काय मत आहे या प्रतीक्षेत राणे असल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेस सोडल्यापासूनच राणे भाजपप्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.