नातेवाईक दाम्पत्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
226

पिंपरी, दि. 24 (पीसीबी): नातेवाईक असलेल्या दांपत्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला एकाने सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

पूजा दिनेश दुर्गावले (वय 40, रा. कामोठे, नवी मुंबई) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर शिवाजी गोताड (वय 38, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या नणंदेच्या घरी संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आल्या होत्या. नणंद आणि तिच्या पतीचे भांडण सुरु झाले. त्यामुळे फिर्यादी यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावरून आरोपी समीर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारले. त्यात फिर्यादी यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.