नवी मुंबईत बिल्डरची गोळ्या घालून हत्या

0
412

नवी मुंबई, दि. ५ (पीसीबी) : नवी मुंबईत एका बिल्डरची पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. डोक्यात गोळी मारल्याने या बिल्डरचा जागीच मृत्यू झाला. तळवळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्रवीण तायडे असे हत्या झालेल्या बिल्डरचं नाव आहे.

घणसोली सेक्टर 21 (तळवली) येथे बांधकाम भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्याच्या वादातून गुरुवारी (4 जून) संधी साधून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर जुन्या काही गुन्हेगारी प्रकरणात तो साक्षीदार असल्याचीही माहिती आहे. यामुळे जुन्या कोणत्या वादातून त्याची हत्या झाली आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

भरदुपारी प्रवीण तायडे आणि साथीदारावर हल्ला
गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत मोटारसायकलवरुन जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक मारली. त्यानंतर मारेकरुंपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. सध्या जखमी साथीदारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तपास पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तायडेच्या संपर्कातील व्यक्तींकडे पोलीस चौकशी करत आहेत.