नवाब मालिकांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर; म्हणाले, क्रूझरेव्ह पार्टीवर…

0
407

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : मुंबईत रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप करणाऱ्या नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

इंडिया टुडेशी बोलताना समीर वानखेडे यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच पंचनामाही कायद्याला धरुनच असल्याचंही ते म्हणाले आहेत. “आम्ही आधीच पत्रकार परिषद घेतली आहे, तरीही मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही पंचनामा करणाऱ्या नऊ जणांचं नाव दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व कारवाई करण्यात आली आहे,” असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला आहे. तसंच कारवाई करताना कायद्याचं पालन करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक यांनी आरोप करताना एनसीबी फक्त सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संबंधित काही ठराविक लोकांवर कारवाई करत असून राजकीय दबाव असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना समीर वानखेडे यांनी ते सर्व सरकारी कर्मचारी असून त्याचं कर्तव्य बजावत होते असं सांगितलं आहे.

“आम्ही सर्व सरकारी कर्मचारी असून आमचं कर्तव्य बजावत आहोत. एनसीबी एक व्यावसायिक संस्था असून जो कोणी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाविरोधात आम्ही कारवाई करत असून यापुढेही करत राहू. गेल्या एक वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही ड्रग्जमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून आकडेवारीतूनही हे स्पष्ट होत आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. यावेळी त्यांनी एनसीबीने गेल्या एक वर्षात ३२० जणांना अटक केली असून दोन मोठ्या ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाककली असून अनेक गँग आणि ड्रग्ज माफियांना उघड केलं आहे अशी माहिती दिली.

“तुम्हाला अनेक लोकांची नावं माहिती आहेत. आम्ही जे काही करत आहोत ते आकडेवारीतून स्पष्ट होत असून हेच आमचं उत्तर आहे. गेल्या एक वर्षात आम्ही १०० कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज पकडले आहेत. भविष्यातही आम्ही असे करत राहू,” असं समीर वाखेडे यांनी सांगितलं आहे.

आर्यन खानविरोधात काय पुरावा आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, हे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि आम्ही सर्व पुरावे कोर्टात सादर केले आहेत. “आम्ही सर्व पुरावे कोर्टात सादर केले असून यापुढेही करत राहू. या प्रकरणाबद्दल बोलायचं गेल्यास आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आलं असून वेगवेगळे ड्रग्ज पकडले आहेत,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.