‘नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल’

0
209

नवी दिल्ली, दि.०८ (पीसीबी) : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस आणखी चिघळताना दिसत आहे. दरम्यान याचे राजकीय पडसाद उमटताना सुद्धा दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असून मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल.’

ओबीसी आणि मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या दरबारात हा विषय मांडणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.