“धर्मात राजकारण नको; तर राजकारणात धर्म पाळायला हवा!”

0
412

पिंपरी,दि. ९ (पीसीबी) “धर्मात राजकारण नको; तर राजकारणात धर्म पाळायला हवा!” असे प्रतिपादन माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड येथे रविवार, दिनांक ०८ मे २०२२ रोजी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘धर्म आणि राजकारण’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना सुशील कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सुनील खर्डे होते; तर पीसीबी टुडेचे संपादक अविनाश चिलेकर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुणाल साठे यांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना कुणाल साठे यांनी, “बजरंग दलाच्या माध्यमातून कोविड काळात अनेक दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु रुग्णांना मानसिक बळ देण्याचे काम आम्ही केले!” अशा भावना व्यक्त केल्या. कै. इंदुबाई सोपानराव भोईर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे हे तृतीय पुष्प आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. सुनील खर्डे यांनी, “व्याख्यानमालेतून तरुणाईला प्रबोधन केले जावे!” असे मत मांडले. जगदीश घुले यांनी प्रास्ताविक केले.

सुशील कुलकर्णी पुढे म्हणाले की, “धर्मात राजकारण असावे की नाही, असा अनेकांना प्रश्न पडतो; परंतु मुळात धर्म आपल्याला कळतो का, हा खरा प्रश्न आहे. ‘धारयेती धर्मा:’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. राजकारण हा मराठी माणसाचा आवडता विषय आहे; पण धर्माचारण आणि राजकारण यांमध्ये नेहमी गल्लत केली जाते. खऱ्या माणुसकीच्या धर्माचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ती दुसऱ्या कोणाचीतरी जबाबदारी आहे, असे आपल्याला वाटते. उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय अन् अडकले पाय! अशी कर्णासारखी सगळ्यांची अवस्था झाली आहे. राजकारणात धर्माचा विषय आला की बाब संवेदनशील बनते. वास्तविक राज्यघटनेनुसार राजकारण चालणे अपेक्षित आहे.

संवैधानिक पद स्वीकारताना राजनिष्ठेशी शपथ घेतली जाते. कोणताही आकस, सूडबुद्धी, पूर्वग्रह न बाळगता किंवा कोणाविषयी ममत्वभाव न ठेवता निरपेक्षपणे मी राजधर्म निभावेल अशी शपथ घेऊनही तसे आचरण केले जाते का? आपल्या देशात पूर्वी राजसत्ता अस्तित्वात असताना राज्यकारभाराचा धर्म ठरलेला असे आणि धर्मगुरू किंवा कुलगुरू त्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असत. ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी इंडियन पीनल कोड निर्माण केले. रशियात राहणारे रशियन, अमेरिकेतील अमेरिकन या धर्तीवर हिंदुस्थानातील नागरिक हिंदू असायला हवेत. मुस्लीम राष्ट्रांमध्ये शरियत कायद्यानुसार काम चालते, ख्रिश्चन राष्ट्रे त्यांच्या धर्मानुसार राजधर्म पाळतात. भारतात हिंदू, जैन, बौद्ध, शीख हे मूळचे धर्म असून मुस्लीम आणि ख्रिश्चन हे परकीय धर्म आहेत. आपल्या देशात संविधानाप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. तरीही मुस्लिमांना त्यांच्या कायद्यानुसार वागण्याची मुभा आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे धर्मग्रंथांची किंवा धर्माचारणची मौखिक परंपरा आहे. ब्रिटिशांनी त्या धर्मग्रंथांचे आपल्या सोयीनुसार अर्थ लावून ते भाषांतरित केले. वास्तविक पुराण हे कथात्मक मौखिक साहित्य आहे. तसेच सत्यनारायण ही एक नीतिकथा आहे. या गोष्टी मौखिक स्वरूपात असल्याने त्यामध्ये अनेक बाबी घुसडून त्यांना जाणीवपूर्वक भंपक, चुकीचे ठरवले गेले. मंत्रांचा, धार्मिक विधींचा विपरीत अर्थ काढून धर्मपरंपरांना बदनाम केले जाते. अर्थातच धर्माचे अवडंबर माजवल्यामुळेच टीकाकारांचे फावले, हेदेखील सत्य आहे.

राजकारणात धर्म नको म्हणून धर्मात राजकारण आणले जाते!” दृष्टांत, मार्मिक टिप्पणी, सूचक वक्तव्य आणि राजकीय संदर्भ उद्धृत करीत खुसखुशीत शैलीतून सुशील कुलकर्णी यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिलीत. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. रोहन जाधव यांनी आभार मानले.