धक्कादायक; पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या

0
326

नागपूर, दि.९ (पीसीबी) – हैदराबाद व उन्नाव येथील घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच नागपूर नजीकच्या कळमेश्वरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे.

नराधम आरोपी संजय पुरी याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी मुलीचे वडील मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात कळमेश्वर येथे आले. ते मजुरी करतात. कळमेश्वरनजीकच्या गावात मुलीचे आजोबा राहातात. दोन्ही गावांना जोडण्यासाठी शेतातून एक रस्ता गेला आहे. शुक्रवारी मुलगी शाळेतून घरी आली. आजोबांकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली व आजोबाकडे गेली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबांकडून घरी जाण्यासाठी निघाली. मात्र, घरी पोहोचली नाही. रात्र होऊनही ती घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. ती आढळली नाही. नातेवाइकांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना नागपुरातील संजय भारती यांच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत आदींसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम संजय पुरी याला अटक केली आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. पुढील तपास पोलिस करत आहेत.