देहुरोड येथील गृहउद्योजकाकडून ५४ हजारांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

0
1053

देहुरोड, दि. २८ (पीसीबी) – किवळे येथील विकासनगरमध्ये गृहउद्योग करणाऱ्या एका इसमाला ‘तुमच्या गृहउद्योगात बालकामगार आहेत, आम्ही इथले फोटो काढले आहेत. आम्हाला ५४ हजार रुपये द्या नाहीतर आम्ही प्रसेवाले बोलवून’, अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२६) दुपारी दिड ते अडीचच्या सुमारास देहुरोड, किवळे सर्वे. नं ४१ विकासनगर येथील कुनाल गृह उद्योग या कंपनीत घडली.

याप्रकरणी कमलेश कन्हैयालाल बचानी (वय ४७, रा. लाईव्ह स्टाईल सोसायटी, डी बिल्डिंग फ्लॅट नं. ३०१, लिंकरोड चिंचवड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार देवीचंद ज्ञानेश्वर देवकुळे (वय ३६, रा. ५८९, महात्मा फुले पेठ, पुणे), राकेश देवीदास वाघमोडे (वय ३३, रा. गंजपेठ आण्णाभाऊ साठेनगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरोपी देवीचंद आणि राकेश हे दोघे ही कमलेश यांच्या कुनाल गृह उद्योग या कंपनीत जबरदस्तीने घुसले आणि ‘तुमच्या गृहउद्योगात बालकामगगार आहेत, आम्ही इथले फोटो काढले आहेत. आम्हाला ५४ हजार रुपये द्या नाहीतर आम्ही प्रसेवाले बोलवून’, अशी धमकी देऊन खंडणी मागितली. यावर आरोपींनी कमलेश यांच्यासोबत तडजोड करुन २७ हजार रुपये घेण्यास ठरवले. या दरम्यान काही कामगार तेथे आले असता दोघे आरोपी तेथून पळून गेले. कमलेश यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी देवीचंद आणि राकेश या दोघांनाही देहुरोड पोलीसांनी अटक केली. देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक योगेश जाधव अधिक तपास करत आहेत.

दरम्यान आरोपी देवीचंद याच्याकडून पोलिसांनी एका मानवअधिकाराचे ओळखपत्र हस्तगत केले आहे.