देशाच्या शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच ‘असे’ घडले

0
223

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक बदल यामुळे भारतीय शेयर बाजाराने एक नवा विक्रम रचला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 50,000 चा टप्पा पार केला आहे. देशाच्या शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच असे घडले असून गुंतवणूकदारांसाठी ही एक नवी संधी आहे.

सकाळी नऊ वाजून 24 मिनीटांनी सेन्सेक्स 266.96 अंकानी उसळला आणि 0.54 टक्क्यांनी वाढून तो 50,059.08 वर पोहचला आहे. मुंबई शेअर मार्केटमधील टॉप 50 शेअर्स असणारा इंडेक्स निफ्टी 79.10 अंकानी उसळला. त्यातही 0.54 टक्क्यांची जबरदस्त तेजी पहायला मिळाली. निफ्टीनेही 14,723.80 चा टप्पा गाठला आहे.

बँकांच्या शेअर्समध्ये तेजी
गुरुवारी सकाळी शेअर मार्केट सुरु होताच बँकांच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली. त्यामुळे शेअर मार्केटने एक नवा विक्रम केल्याचं पहायला मिळालं. बॅंक निफ्टीनेही 32,700 चा टप्पा पार केला आहे. शेअर मार्केट सुरु होताच सुरुवातीच्या काही वेळेतच बँक निफ्टीमध्ये 0.49 टक्के म्हणजे 158.95 अंकांची उसळ पहायला मिळाली.

अमेरिकेत तेजी
अमेरिकेत नवे राष्ट्रपती जो बायडेन यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. त्याचा परिणाम म्हणून जगातल्या इतर शेअर मार्केटमध्येही तेजी पहायला मिळाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारानेही 50 हजारचा स्तर पार केल्याचं दिसून आलं. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स
आज सेन्सेक्सच्या बऱ्यापैकी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, आरआयएल, इन्डसइन्ड बँक, एचसीएल टेक, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी आणि टेक महिन्द्रा आजचे टॉप गेनर्स आहेत. टीसीएस, एचडीएफसी बँक आजचे टॉप लूजर्स आहेत.

आज शेअर मार्केटमध्ये निफ्टीच्या सर्व प्रमुख 12 इन्डेक्सवर तेजी आल्याचं पहायला मिळालंय. ऑटो इन्डेक्समध्ये 1 टक्क्याहून जास्त तेजी आहे. आयटी आणि रियल्टी इन्डेक्समध्ये अर्ध्या टक्क्याहून जास्त तेजी आल्याचं दिसून येतंय. बँक आणि फायनान्शिअल इन्डेक्स मजबूत झाले आहेत. एफएमजीसी आणि फार्मा क्षेत्रातही तेजी आहे.