देवेंद्र फडणीस यांचा सोलापूर दौरा रद्द …

0
147

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती बिघडल्याने फडणवीसांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर फडणवीस मुंबईला रवाना झाले आहेत. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. या भेटीत फडणवीस दोन अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांची मतं वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हं होती. मात्र फडणवीसांचा शनिवारचा दौरा तूर्तास रद्द झाल्याने राज्यसभा निवडणुकांवर त्याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोलापूर दौऱ्यात देवेंद्र फडणवीस येथील दोन अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा होती. त्यापैकी एक आमदार भाजप पुरस्कृत, तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकटवर्तीय आमदार मानला जातो.
कोण आहेत हे आमदार?

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे या दोघा अपक्ष आमदारांचं मन फडणवीस वळवणार असल्याची चर्चा होती. भेटीनंतर हे दोन्ही आमदार काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं.

राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे, मात्र करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांची राष्ट्रवादीशी जवळीक आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी शिंदेंचे निकटचे संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांचं मत मिळवताना फडणवीसांना कसरत करावी लागू शकते.

भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही माघार न घेतल्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या जागेवर भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता १० जून रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.