देवेंद्र फडणवीस यांची भाजपा नगरसेवकांकडे मिनतवारी

0
403

– पिंपरीगावातील भाजपा नगरसेवक संदिप वाघेरे यांची माहिती

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भाजपा मध्ये कायम उपेक्षा झालेल्या काही बलाढ्य नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निर्णय केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पक्षांतराचा भाजपाला मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने आता दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या नगरसवेकांना वैयक्तिक फोन करणे सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत या नगरसेवकांनी भाजपा सोडू नये, अशी अक्षरशः मिनतवारी कऱण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांत होणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधी राष्ट्रवादी असा सरळ सामना रंगणार असल्याचे आजचे सर्वसाधारण चित्र आहे. एकूण १२८ सदस्यांमधील भाजपाच्या ७७ पैकी २४ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचे ठरवले आहे. पक्ष सोडणारे बहुतांश नगरसेवक हे ताकदिचे आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग रचना स्वतःच्या मनासारखी केल्याने आपली डाळ शिजणार नाही याचा अंदाज आलेल्या नगरसेवकांनीही राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याने भाजपाची पायाखालील वाळू सरकली आहे. राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी तब्बल १५ हजाराचा मोर्चा काढल्याने भाजपाचे नेते सैरभैर आहेत. नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांच्या पाठोपाठ सोमवारी (दि.२१) आणखी तीन नगरसेवक आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्याने भाजपाच्या दोन्ही आमदारांचे धाबे दणानले आहेत.

भाजपामधून राष्ट्रवादीत होणारे संभाव्य पक्षांतर रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी भरपूर प्रयत्न केले, पण त्यांना सपशेल अपयश आले. त्यावर तोडगा म्हणून अंतिम क्षणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून ते नगरसेवकांना वैयक्तीक फोन करत आहेत.  पीसीबी टुडे शी बोलताना एका भाजपा नगरसेवकाने सांगितले की, होय…मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. भाजपाच्या स्थानिक आमदारांनी पाच वर्षांत मला किती त्रास दिला त्याचे गाऱ्हाणे मी केले. मी कोणताही कार्यक्रम घेतला तर, का घेतला म्हणून आमदार खोडा घालतात. दोन वेळा माझे नाव स्थायी समिती सदस्यपदासाठी असताना त्यांनी मला संधी दिली नाही. माझ्या वार्डमधील कामे ते रद्द करतात. त्यामुळे विकास कामे रखडली. गेल्या पाच वर्षांत भाजपा नेत्यांना आपली आठवण आली नाही आणि आता निवडणुका जवळ आल्याने पक्ष सोडू नका, अशी विनंती फडणवीस मला करत असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल जो जबरदस्त मोर्चा काढला होता तेव्हापासून वातावरण बदलले आहे, असेही वाघेरे यांनी अवर्जून नमूद केले. आपल्या प्रभागातील शिवपुतळा, दोन उद्याने, दोन खेळाची मैदाने यांच्या उद्घाटनासाठी आपण अजितदादांना विनंती केली असून ते येणार असल्याचेही त्या नगरसेवकाने सांगितले.

सोमवारी आणखी तीन नगरसेवकांचा रामराम –
भाजपातील आमदारांच्या मनमानीला वैतागलेल्या आणखी तीन नगरसेवकांचे राजीनामे सोमवारी (दि.२२) रोजी होणार असून ते सर्वजण लगेचच राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत, अशी माहिती मिळाली. यापूर्वी भाजपा संलग्न कैलास बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून मोशी येथील भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत भाजपाला मोठे खिंडार पाडायचे अशी राष्ट्रवादीची व्युहरचना असून नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे राज्यातील बडे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.