दुष्काळ जाहीर करण्याची गरजच नाही! – बच्चू कडू

0
250

अमरावती,दि.०५(पीसीबी) – परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडाली असून, शेतीपिकांची नासाडी झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यंदा राज्यभरात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण खरीप पीक हातातून गेले आहे. मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसाने रब्बीचा हंगाम धोक्यात आला आल्याने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवले जाणारे राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलंय. जिथे खूपच पाऊस झालाय तिथे सरकारची मदत पोहोचली आहे, सरकार मदत करत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे असं वाटत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले.

अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं. अशा सगळ्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करुन मायबाप सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी झाली. मात्र सरकारी पातळीवरुन ‘मदत करतो आहे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही’, अशी वक्तव्ये शिंदे सरकारमधील मंत्री करतायेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर आताच्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले आणि ठाकरे सरकारमधील माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही सत्तारांचीच री ओढली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, तुफान पावसानंतर मी मतदारसंघात गेलो. धारणीला गेलो, तिकडे यवतमाळ गेलो, नंतर अकोला वगैरे असं सगळीकडे फिरलो. पेरणी झाल्यानंतर काही दिवसानंतर पावसाचा सपाटा सुरू झालाय. त्यामध्ये जिथं ६५ MM वरती पाऊस झाला, त्याची मदत संपूर्ण महाराष्ट्रात वाटप झालेली आहे. जिथं सततचा पाऊस म्हणजे सलग सात दिवस पाऊस आलेला आहे. १०-१५ MM वरती जर गेलेला पाऊस असेल तर त्याच्यासाठीही आता सरकारनं शासन निर्णय काढला आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी याच्यात ५० टक्के महाराष्ट्र कव्हर होतो, म्हणजेच ५० टक्के शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळतेय.

“मग राहिला परतीच्या पावसाचा प्रश्न… त्याचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ते पंचनामे आल्याबरोबर लगेच सरकार याच्यामध्ये मदत जाहीर करणार आहे. आता राहिला प्रश्न ओला दुष्काळ का नुकसान भरपाई? आता ओला दुष्काळ जाहीर करायचा आणि नुकसान भरपाई द्यायची नाही, त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून माझं असं मत आहे की तुम्ही जाहीर काही करा पण मदत नक्की द्या. सध्याच्या सरकारने मदत द्यायसाठी अतिशय व्यवस्थित पावलं उचलली आहे. पाच ते सात हजार कोटी रुपये सरकारनं मदत पण दिलेली आहे. ती परिपूर्ण जरी नसली तरी उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत पोहोचेल”, असं सांगत ओला दुष्काळ जाहीर करण्याची खरंच गरज नाही, असं बच्चू कडू म्हणाले