दीडशे फूट लांबूनच पाहिला मृत्यूदेह… – कोरोनाच्या भीतीने माणुसकीही आटली, कशी ते वाचा अन डोक्याला हात लावा

0
481

पिंपरी, दि११. (पीसीबी) – घरातील एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्‍ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्‍त या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.

करोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले जातात. जर मयत व्यक्‍तीला कोणीच नातेवाईक नसल्यास त्याच्यावर वायसीएम प्रशासनाकडून अंत्यसंस्कार केले जातात.

पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्‍तीला त्रास होऊ लागल्याने तो काळेवाडी येथील आपल्या भावाकडे आला. भावाने त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आणि तेथूनच त्यांच्या मृतदेहाची अवहेलना सुरू झाली.

करोना बाधिताचा मृत्यू झाल्यावर त्याचा भाऊ आणि मुलगा सकाळी सहा वाजता रूग्णालयात दाखल झाला. मात्र त्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. प्रशासनाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे, अशी त्यांची मागणी होती. तर नातेवाईक असल्याने असे करता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते कॉंग्रेसचे पदाधिकारी मनोज कांबळे या पुढाकाराने हालचाली सुरू झाल्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेह शवागृहात पडून होता. अखेर आयुक्‍तांनी आदेश दिल्यावर प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी हालचाली सुरू केल्या.

मृतदेह दुपारी लिंकरोड, चिंचवड येथील स्मशानभूमी रुग्णवाहिकेतून आणण्यात आला. त्यावेळी नातेवाईक दीडशे फूट लांब उभे होते. मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली काढण्यासाठी मदत करा, अशी विनवणी रुग्णवाहिकेसोबत आलेला कर्मचारी करीत होता. माझ्याकडे असलेले पॅक हॅन्डग्लोज तुम्ही घाला, मी तसाच मृतदेह उचलतो, अशीही विनवणी तो कर्मचारी नातेवाईकांना करीत होता. तरीदेखील रक्‍ताच्या नात्याला पाझर फुटला नाही.

“तुम्हीच सगळे करा, आम्ही लांबून पाहतो’, असे नातेवाईकांनी सांगितले. पीपीई किट किंवा इतर आवश्‍यक सुरक्षिततेची साधने नसतानाही रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून तो विद्युत दाहिनीकडे नेला. त्यानंतर स्मशानभूमीत आलेले नातेवाईक अंत्यसंस्काराची वाट न पाहता निघून गेले.
नातेवाईक नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे की नाही, असा प्रश्‍न रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना पडला. मृतदेह जाळलाच नाही, असा आरोप नातेवाईकांनी केल्यास काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मात्र त्यावेळी तिथे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या कर्मचाऱ्याची समजूत काढल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.