दि सेवा विकास बँकेच्या चेअरमन, संचालक मंडळासह बँक अधिकाऱ्यांवर आणखी दोन गुन्हे दाखल, वाचा सविस्तर…

0
352

पिंपरी,दि.०९(पीसीबी) – वाकड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 76 लाखांची तर पिंपरी येथील गुन्ह्यात 28 लाख 50 हजार 902 रुपयांची दि सेवा विकास बँकेने फसवणूक केल्या प्रकरणी ‘दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह’ बँकेचे चेअरमन, बँकेचे संचालक आणि बँक अधिकारी यांच्या विरोधात वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मयूर बाळकृष्ण पेटकर (वय 35, रा. काळेवाडी. मूळ रा. सांगली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 2012 ते 2021 या कालावधीत दि सेवा विकास बँक काळेवाडी शाखा येथे घडला. दि सेवा विकास बँकेने बचत खाते, मदत ठेव खाते यांचे धोरण वेळोवेळी जादा व्याजदराचे धोरण जाहीर केले. संबंधित आरोपींनी कट रचून आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या कुटुंबियांना मदत ठेवी बँकेत ठेवण्यास भाग पाडले. मुदत संपल्यानंतर मदत ठेवी आणि सध्या बचत खात्यावरील सर्व पैसे खातेदार मागतील त्यावेळी एक रकमी सर्व पैसे परत करणे बँकेवर बंधनकारक होते. असे असताना फिर्यादी, त्यांचे कुटुंबीय आणि साक्षीदारांचे एकूण 76 लाख रुपये बँकेने परत न करता फसवणूक केली असल्याचे पेटकर यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंगारे तपास करीत आहेत. वर्षा जितेंद्र कोकल (वय 54, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 2015 ते 2021 या कालावधीत दि सेवा विकास बँक पिंपरी वाघेरे शाखेत घडला.

दरम्यान फिर्यादी वर्षा कोकल आणि इतर ठेवीदारांच्या ठेवी मागणीनुसार उपलब्ध करून देणे बँकेवर बंधनकारक आहे. असे असताना आरोपींनी आपसात संगनमत करून पूर्वनियोजित कट करून फिर्यादी आणि इतर लोकांनी वारंवार मागणी करूनही 28 लाख 50 हजार 902 रुपयांच्या ठेवी परत न करता विश्वासघात व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाईकवाडे तपास करीत आहेत.