दिवस-रात्र कसोटीचा दीड दिवसात खेळ खल्लास

0
386

अहमदाबाद, दि. २६ (पीसीबी) : बहुचर्चित भव्य दिव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उदघाटनाच्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ दीड दिवसात खल्लास झाला. खेळपट्टी वरून कितीही चांगी दिसत असली, तरी तिचा अंदाज कुणालाच आला नाही. या खेळपट्टीने म्हणायला दोन दिवसांत ३० फलंदाजांचा बळी घेतला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राच्या सुरवातीलाच भारताने ४९ धावांचे आव्हान ७.५ षटकांत सहज गाठले. भारतासाठी अर्थात ती फक्त औपचारिकता होती. खेळपट्टी जेवढी वेगवान होती, तितक्याच वेगात ही कसोटी संपुष्टात आली. अक्षर पटेल याने सामन्यात ११ गडी बाद करून सामन्याचा मानकरी किताब पटकावला. भारताने दहा गडी राखून सामना जिंकताना मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

भारताने हा दिवस-रात्र कसोटी सामना जिंकून चार सामन्यातील आपली आघाडी भक्कम केली. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी त्यांना हा विजय पुरेसा नाही. त्यांना अखेरचा चौथा कसोटी सामना एकतर अनिर्णित राखावा लागेल किंवा जिंकावा लागेल. इंग्लंडने चौथा सामना जिंकल्यास मालिका अनिर्णित राहिल आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल आणि ते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. या पराभवामुळे इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पहिल्या दिवशी १३ आणि दुसऱ्या दिवशी तब्बल १७ फलंदाज गारद झाले. खेळपट्टी खेळण्यासाठी फार काही कठिण नव्हती असे कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिच्यात काही तरी दडले होते आणि याचाच अंदाज कुणाला आला नाही. खेळपट्टीवर गवत होते, पण ते वेगवान गोलंदाजी साथ देत नव्हते. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रापासून खेळपट्टी फिरकीला साथ देत होती. खेळपट्टीवरील हिरवळ पाहून ज्यो रुटने फलंदाजी घेतली, खरी पण ती जबाबदारी त्यांचे फलंदाज पेलू शकले नाहीत. जोफ्रा आर्चरने घेतलेली गिल आणि इशांत शर्माने घेतलेली डॉम सिब्लीची विकेट वगळता वेगवान गोलंदाजांना या सामन्यात काहीच करता आले नाही. गोलंदाजी करण्याची वेळ तर अभावानेच आली. फिरकी गोलंदाजांनी नाही म्हणायला कमाल केली. भारतीय फिरकी गोलंदाजांनी १९, तर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी नऊ गडी बाद केले.

कसोटी क्रिकेट सामना पाच दिवसाचा पण, अलिकडे वाढत चाललेल्या झटपट क्रिकेटच्या प्रभावामुळे सामने अभावानेत पाच दिवस चालताना दिसतात. इंग्लंडविरुद्धचा आजचा सामना म्हणायला दोन दिवसात संपला. पण, तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू होत नाही, तो रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. खेळपट्टीवर स्कीड होणारा चेंडू आणि वेगाने येणारे चेंडू याचा अंदाज कुणालाच आला नाही. इंग्लंडचे फलंदाज तर यात साफ अडकले. भारतीय फलंदाज देखील यातून सुटले नाहीत. भारताचे पाच फलंदाज बदली गोलंदाजी करणाऱ्या ज्यो रुटने गारद केले यावरून खेळपट्टीच्या दर्जाचा अंदाज यायला पुरेसा आहे.

भारताला झटपट गुंडाळण्याचे काम इंग्लंडच्या गोलंदाजांनी पार पाडले. पण, त्यानंतर भारताच्या गोलंदाजीचा सामना करताना ते इतक्या झटपट बाद झाले की पहिल्या डावात न आलेली शंभरीच्याआत गारद होण्याची नामुष्की त्यांच्यावर दुसऱ्या डावात आली. चेंडूच्या वेगाला ते दुसऱ्या डावात इतके फसले, की त्यांना जेमतेम ८१ धावांचीच मजल मारता आली. खेळपट्टीवर टिकण्याचे धाडस त्यांना दाखवता आले नाही. पहिल्या कसोटीत भारतीय फिरकी आत्मविश्वासाने खेळणारा कर्णधार ज्यो रुटही या वेळी फिका पडला. रुटचे अपयश हेच खरे इंग्लंडच्या पराभवाचे कारण म्हटले, तर चूक ठरणार नाही. कारण, त्याच्याशिवाय इंग्लंडमध्ये अनुभवी खेळपट्टीवर उभा राहणारा फलंदाज नाही. जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी वेगवान गोलंदाज संघात होत, पण त्यांच्या वेगाचे येथे काही चालले नाही.

अश्विनने आपली फिरकीची जादू कायम राखली. त्याला अक्षर पटेलने सुरेख साथ दिली. घरच्या मैदानावर खेळताना तो त्याच्या पुढे निघून गेला. दुसऱ्या डावांत आणि पदार्पणाच्या सलग तिसऱ्या डावात त्याने पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. अर्थात, अश्विनने दुसऱ्या डावात चार गडी बाद करताना कारकिर्दिमधील चारशे बळीचा टप्पा ओलांडला.

संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड ११२ आणि ८१ (बेन स्टोक्स २५, ज्यो रुट १९, अक्षर पटेल ५/३२, आर. अश्विन ४/४८) पराभूत वि.भारत १४५ (रोहित शर्मा ६६, विराट कोहली २७, ज्यो रुट ५/८, जॅक लिच ४-५४) आणि बिनबाद ४९ (रोहित शर्मा नाबाद २५, शुभमन गिल नाबाद १५)