दसऱ्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, दादा गटाला तीन राज्यमंत्री, एक कॅबिनेट

0
233

पुणे, दि. ९ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेला राज्यमंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान यावेळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) आमदारांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त ‘साम टिव्ही’ने दिले आहे.

तर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची प्रतीक्षा करत आहेत. तर महायुतीत राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या प्रतीक्षेवर पाणी फिरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळाल्यानंतर शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे गटातील अस्वस्थता गेले काही दिवस वाढत चालली होती.