थेरगावमध्ये दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला दगडाने जबर मारहाण

0
852

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करत दगड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१४) रात्री पावनेएकच्या सुमारास थेरगाव येथील पुरोहित स्वीटहोम समोर घडली.

अमन सुनिल कौशल (वय १९, रा. क्रांतीवीरनगर, थेरगाव) असे दगडाने मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवी भिलारे आणि प्रसाद थोरात या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावनेएकच्या सुमारास आरोपी रवि आणि प्रसाद या दोघांनी फिर्यादी अमन याने त्या दोघांना दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी रवी आणि प्रसाद या दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या दोघांना अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.