‘त्या’ कारखान्यांनी माझे 28 लाख रुपयांचे नुकसान होत आहे. विचार करा.. मला झोप तरी येत असेल का?

0
606

बारामती, दि.०४ (पीसीबी) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिस्थितीच्या वेगळेपणाचे उदाहरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामतीत थेट स्वतःच्या कारखान्याचे म्हणजे छत्रपती कारखान्याचे उदाहरण दिले आणि उपस्थितांमध्ये बराच काळ हशा पिकला. यावेळी अचानक दादांनी स्वतःचे उदाहरण दिले. माझा चार हजार टन ऊस छत्रपती कारखान्याला जातो. असं सांगत त्यांनी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याकडे नजर फिरवली आणि म्हणाले, प्रशांत..अरे आपला 2500 रुपये भाव ना रे?.. त्यावर प्रशांत काटे यांनी 2400 रुपये एफआरपी भाव आहे असे सांगितले.

मग अजितदादा म्हणाले, आता बोला..सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत मला प्रतिटनी 700 रुपयांचा फटका बसला आहे. माझा 4 हजार टन ऊस कारखान्याला जातो, म्हणजे माझे 28 लाख रुपयांचे नुकसान होत आहे. विचार करा.. मला झोप तरी येत असेल का? अजित दादा असे म्हणाले आणि सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर पुन्हा दादा मिश्किलपणे म्हणाले..अरे बाबांनो, नुकसान माझं होतंय आणि तुम्ही हसताय काय?

अजित दादा पुढे म्हणाले, असे असूनही सोमेश्‍वर कारखान्याच्या बाबतीत हौशे, नवशे, गवशे आता पॅनल करू म्हणतायेत. पॅनल त्यांनी जरूर करावा. कारण लोकशाहीत त्यांना हक्क आहे. परंतु ही निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3100 रुपये प्रतिटनी दर दिला, हे सांगताना त्यांनी इंदापूरच्या कर्मयोगी कारखान्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले 2100 रुपये प्रतिटन भाव देऊन सुद्धा कर्मवीर कारखाना बिनविरोध केला गेला आणि 3100 रुपये प्रतिटन भाव देऊनही सोमेश्‍वर कारखान्यावर निवडणुकीचा घाट घातला जात आहे. हे आश्चर्यकारक आहे. सहकारात असे करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.