…त्यावेळी माझी एकच जात असते; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार

0
591

जयपूर, दि. २६ (पीसीबी) – आज संविधान दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी  समाजातील भेदभाव नष्ट व्हावा, यासाठी दिशा दाखवली. तर काँग्रेस आणि त्यांचे नेते मोदींची जात कोणती?, असा प्रश्न करत आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. जेव्हा देशातील पंतप्रधान विदेशात जातो, त्यावेळी त्याची जात एकच असते आणि ती म्हणजे ‘सव्वाशे कोटी भारतीय, अशा शब्दांत पंतप्रधान  मोदी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदी आज ( सोमवारी) राजस्थानमधील भिलवाडा येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर तोफ डागली. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात  काँग्रेस नेते सी पी जोशी यांनी मोदींच्या जात आणि धर्माबाबत प्रश्न केले होते. त्या प्रश्नांना मोदी यांनी   प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, तुम्ही चार पिढी देशावर राज्य केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे यांचे उद्योग सुरु होते. तुमच्या काळात ग्रामीण भागातील ४० टक्के घरांमध्येही शौचालय नव्हते. मात्र, आम्ही हे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत नेले.  मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मी गरीब आईला चुलीवर जेवण करताना पाहिले होते. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर दिले, असे मोदींनी यावेळी सांगितले.