तोडल्या धर्माच्या भिंती; बुलडाण्यात आजारी मुस्लिम चालकासाठी हिंदू अधिकाऱ्याचा रोजा

0
399

बुलडाणा, दि. ३१ (पीसीबी) – आपल्यामधील धर्माची भिंत माणुसकीपेक्षाही मोठी नसल्याचं बुलडाण्यामधील एका अधिकाऱ्याने सिद्ध केलं आहे. आजारी असणाऱ्या आपल्या मुस्लिम चालकासाठी हिंदू अधिकाऱ्याने चक्क रोजा पाळला आहे. संजय माळी असं या अधिकाऱ्यांचं नाव असून ते बुलडाण्यात विभागीय वन अधिकारी म्हणून काम करतात.

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असणारे मुस्लिमधर्मीय लोक रोजा पाळतात. संजय माळी यांचा चालक मुस्लिम असून जफर असं त्याचं नाव आहे. पण आजारी असल्याने जफरला रोजा पाळणं शक्य होत नव्हतं. संजय माळी यांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या वतीने आपण रोजा पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी आपल्या धर्माला आड येऊ दिलं नाही.

यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘६ मे रोजी मी जफरला रोजा पाळणार आहेस की नाही यासंबंधी विचारलं. तर त्याने कामाच्या तणावात प्रकृतीच्या कारणाने आपल्याला शक्य होऊ शकत नसल्याचं सांगितलं. म्हणून त्याच्याऐवजी मी रोजा पाळण्याचं ठरवलं’. संजय माळी यांनी फक्त आश्वासन दिलं नाही. ६ मे पासून रोज पहाटे ४ वाजता ते उठतात आणि जेवण करतात. नंतर संध्याकाळी सात वाजता रोजा सोडतात.

सांप्रदायिक सलोख्यासाठी हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं असता त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक धर्म आपल्याला काहीतरी चांगली शिकवण देत असतो. आपण सर्वांनीच सांप्रदायिक सलोख्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रथम माणुसकी पाहिली पाहिजे, धर्म द्वितीय आहे. रोजा ठेवल्यापासून मला खूप फ्रेश वाटत आहे’.