तोडपाणी होत नसल्याने डॉक्टर भरतीचा विषय रखडला अत्यंत महत्वाच्या विषयालाच विधी समिती तहकूब, कोरोना योध्या तज्ञ डॉक्टरांचा भाजपकडून पानउतारा

0
675

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – कोरोना साथीत उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने पुणे, मुंबई महापालिकेने तज्ञ डॉक्टरांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत. दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने भरती केलेल्या डॉक्टरांना कायम करण्यासाठी नगरसवेकांची अक्षरशः मिनतवारी करावी लागत आहे. अत्यंत महत्वाचा असा हा विषय आजच्या विधी समितीत मंजूर होण्याची अपेक्षा होती, पण केवळ तोडपाणी होत नसल्याने समितीची सभाच तहकूब कऱण्यात आल्याचे समजले. एकिकडे कोरोना योध्दा म्हणून डॉक्टरांचा महापालिका सभेत गौरव करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या कामाला लाल बावटा दाखवायचा, अशा या सत्ताधारी भाजपच्या भुमिकेने आता सर्व डॉक्टर संतापले असून प्रसंगी रामराम करायच्या विचारात आहेत. दरम्यान, निवड झालेल्या सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन २७ मे रोजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या भरतीसाठी महापालिकेने जाहिरात दिली होती. त्यासाठी रितसर निवड प्रक्रीयाही राबविण्यात आली. ३ डिसेंबरला २०१९ रोजी मुलाखत घेतली आणि २७ फेब्रुवारी २०२० रोजी निवड झालेल्या व प्रतिक्षेतील डॉक्टरांची यादी जाहिर करण्यात आली. तेव्हा पासून हे सर्व डॉक्टर्स नियुक्ती पत्राची वाट पहात आहेत. निवड झालेले ६० डॉक्टर्स तसेच तत्पूर्वी भरती केलेले डॉक्टर मिळून १०३ जणांच्या नियुक्तीचा हा प्रश्न आहे. हे सर्वजण जीवावर उदार होऊन कोरोनाच्या रुग्णांसाठी वायसीएम मध्ये दिवसरात्र अगदी एखाद्या योध्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाचविण्यासाठी लढत आहेत.

एकूण परिस्थिती पाहता या सर्व डॉक्टरांना नियुक्तीचे पत्र तत्काळ मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्या सर्वांचा मोठा अपेक्षाभंग झाला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रितसर सर्व प्रक्रीया पूर्ण केली. त्यानंतर महापालिका विधी समितीच्या संमतीसाठी हा विषय १५ मे रोजीच्या विषयपत्रावर मांडण्यात आला. दोन महिने कोरोनाचा लॉकडाऊन असल्याने विधी समितीची बैठक पुढे ढकलन्यात आली होती. किमान आजच्या (दि.८) बैठकीत या विषयावर शिक्कामोर्तब होईल, असे डॉक्टांना वाटत होते. दुपारी १२ वाजताची बैठक होती. समिती अध्यक्षा अश्विनी बोब़डे या २.३० वाजता आल्या. तत्पूर्वी मनिषा पवार आणि उषा काळे या बैठकीसाठी आल्या होत्या. वेळेत बैठक का सुरू झाली नाही त्याबाबत वेगळीच चर्चा आहे. या समितीमध्ये खुद्द महापौर माई ढोरे यांच्यासह उषा वाघेरे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, सुलक्षणा धर, प्रमोद कुटे, मनिषा पवार, उषा काळे सदस्य आहेत. अवघे तीन सदस्य उपस्थित राहिल्याने बैठक तहकूब कऱण्यात आली. आता ही समिती सभा १२ जून रोजी ठेवण्यात आली आहे. आजच्या विधी समितीत हा विषय मंजूर झाला असता तर येणाऱ्या (२०जून) महापालिका सभे समोर त्यावर निर्णय झाला असता. आता ते अशक्य असल्याने किमान दोन महिने हा विषय पेंडीग राहणार आहे.

विधी समितीतून निरोप, `येऊन भेटा`…
कोरोना साथीमध्ये डॉक्टरांचे महत्व ओळखून किमान त्यांचा सन्मान म्हणून तरी या महत्वाच्या विषयावर निर्णय घेणे आवश्यक होते. त्याबाबत चालढकल करण्यात आली आहे. या मागचे वास्तव जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळेच सत्य समोर आले. गेले दोन महिने निवड झालेल्या डॉक्टरांना समितीच्या काही सदस्यांकडून `येऊन भेटा`… असे निरोप वारंवार येत आहेत. निरोप देऊनही डॉक्टर भेटत नसल्याने मांडवली होत नाही म्हणून बैठक पुढे ढकलण्यात आली, अशी चर्चा आहे. निरोप मिळालेल्या डॉक्टरांनीही नाराजी प्रकट केली आहे. आम्ही निव्वळ मेरीटवर निवडले गेलो असताना आता स्वतंत्र कोणाला भेटायची गरज काय, असा रोखठोक सवाल हे डॉक्टर करत आहेत. पुणे, मुंबई महापालिकेसह खासगी रुग्णालयांतून या तज्ञ डॉक्टरांना प्रचंड मागणी आहे. तीन लाख रुपये महिना मानधन देण्यास खासगी रुग्णालये तयार असताना केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेने हे डॉक्टर वायसीएम मद्ये थांबले आहेत. विधी समितीच्या काही सदस्यांनी या डॉक्टरांच्या भरतीसाठी २० ते ३० लाख प्रत्येकी भाव ठरविल्याचा गौप्यस्फोट एका सदस्याने केला. ६० तज्ञ डॉक्टरांसह १०३ जणांचे मिळून किमान १५ ते २० कोटींची तोडपाणी करण्याचे मनसुबे काही (सर्व नाही) सदस्यांनी रचले आहेत.

देशात, राज्यात तज्ञ डॉक्टरांची अत्यंत कमतरता आहे. कोरोना साथीत काही शहरांतून डॉक्टर मिळत नाहीत. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांत आज तज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने महापालिका हतबल आहे. सद्या निवड केलेल्या डॉक्टरांची मुदत २० ऑक्टोबरला संपते आहे.

दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेला असे तज्ञ डॉक्टर मिळूनसुध्दा त्यांच्याकडून नको ती अपेक्षा ठेवली जात असल्याने सत्ताधारी भाजप बरोबर आता विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांबद्दलही लोक संशयाने पाहू लागले आहेत.
दरम्यान, या संदर्भात प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आपण ११८ पदांसाठी जाहीरात दिली होती, पण फक्त ७४ डॉक्टर मिळालेत. आजच्या घडिला त्यांची नितांत गरज आहे.