‘तुम्ही मुख्यमंत्री नाही हे मनातून काढा. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे’; मलिकांचा फडणवीसांना चिमटा

0
453

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : ‘मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही’, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे. ‘तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे’, असा चिमटा नवाब मलिक यांनी काढला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला आहे.

यावेळी त्यांनी कोळसा टंचाईवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात कोळसा तुटवडा निर्माण झालाय त्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला त्यांनी चढवला. देशात कोळसा मिळत नाहीय. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाहीय. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होतेय, असंही ते म्हणाले.

यूपीए सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे त्यामुळे विजेची निर्मिती झाली पाहिजे म्हणून पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या. त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या. त्या आजपर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत, असं त्यांनी सांगितलं. कोळशाच्या तुटवडा…खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले.