“तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक…”

0
318

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – “मी शांत आणि संयमी आहे पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीने कुटुंबावरती किंवा मुलाबाळांवरती येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छीतो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडीच्या आमदारांना त्रास देत असल्याच्या प्रश्नासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचेही म्हटले आहे.

‘सरकारवर दबाव आणण्यासाठी ईडी सारख्या संस्थांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशत आणि दडपशाही करत आहेत. आमदारांनी गुडघे टेकावेत यासाठी हे सारं केलं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता?’, असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, “मला जेव्हा आव्हानं मिळातात जेव्हा जास्त स्पुर्ती येते असं म्हटलं आहे. “तुम्ही महाराष्ट्रातल्या मातीतला जो चमत्कार म्हणालात तो खरोखरच आहे. महाराष्ट्राच्या मातीत एक तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली, आपत्ती आल्या. भलेभले अंगावरती आले पण काय झालं. जसं मी दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो त्यात माझ्या आजोबांच्या दसऱ्याच्या पहिल्या भाषणातील संदर्भ दिला होता. महाराष्ट्र हा काही मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचलं तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पहायचे असतील तर पहायला मिळतील. अशी संकट अंगावर घेत आणि त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही. कोणी कितीही आडवे आले तर त्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असं उद्धव यांनी विरोधांना सुनावलं.

“संपूर्ण देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. संपूर्ण एक वर्षानंतर आता उघडपणे आणि निर्ल्लजपणे महाराष्ट्रात अघोरी प्रयोग सुरु झालेत,” असं राऊत यांनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जश्यास तसं उत्तर मिळेल असा इशाराच दिला. “मी शांत आणि संयमी आहे पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीने कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छीतो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलं-बाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

‘शरद पवार कमी उंचीचे नेते ?’ –
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होतं. त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला. पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या विधानाबद्दल संजय राऊत यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घेण्यासाठी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.

“शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत…प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले. त्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले,”होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

‘काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?’ –
“मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता, मला चंपा म्हणतात ते चालतं का? मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.