तुमचा स्वाभिमान कुठे आहे? ; राज ठाकरेंचा यूपी, बिहारच्या तरूणांना सवाल

0
1347

मुंबई, दि. २ (पीसीबी) – तुमचे यूपी, बिहारमधील नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमान सोसावा  लागतो. तुमचा स्वाभिमान कुठे आहे?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) कांदिवली येथे झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केला. 

उत्तर भारतीयांच्या मनात गैरसमज आहेत. ते मी दूर करायला आलो आहे. मी कोणतेही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, असे त्यांनी सुरुवातीला सांगितले. ते  यावेळी म्हणाले, पहिल्यांदाच हिंदीत भाषण देत आहे. जशी हिंदी तशीच मराठी, कन्नड, मल्ल्याळम वगैरे भाषांना प्रादेशिक महत्त्व आहे. माझी जी भूमिका आहे, त्यावर मी ठाम आहे. मी आज तीच तुम्हाला हिंदीतून समजवायला आलो आहे.

महाराष्ट्रात अनेक राज्यातून येथे लोक येतात. यूपी, बिहारमधून बहुतांश येतात. माझे म्हणणे एकच आहे की आधी स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा.  प्रादेशिक अस्मितेबाबतचे आपले मत अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी राज यांनी माजी राष्ट्रपती, पंतप्रधानांची विधाने लोकांसमोर ठेवली. ते म्हणाले, ‘भारताची रचना युरोपसारखी आहे. येथे प्रत्येक राज्य एका देशासारखेच आहे. भारताला सर्वाधिक नेते यूपीतून मिळाले. यूपीतील तरुणांना नोकरीसाठी बाहेर का पडावे लागते, याचा विचार करा. ज्या प्रदेशात जाल तिथली भाषा आधी शिकायला हवी, असे ते म्हणाले.