तीन तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर; आता तीन तलाक देणे ठरणार गुन्हा

0
465

दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक आज (मंगळवार) आखेर मंजूर करण्यात आले. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने मुस्लिम समाजातून तीन तलाक कायमचाच हद्दपार झाला असून तीन तलाक देणे हा यापुढे गुन्हा ठरणार आहे. राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने देशभरातील मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.

आज सकाळी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर प्रदीर्घ काळ चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली. त्याला भाजपने विरोध केला होता. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याबाबत राज्यसभेत मतदान घेण्यात आले. यावेळी सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवण्याचा प्रस्ताव १०० विरुद्ध ८४ मतांनी फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर मुख्य विधेयकावर मतदान घेऊन ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मतदान सुरू होण्यापूर्वी या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही पक्षांनी सभात्यागही केला होता.