तिरडी आंदोलनाची दखल; महापालिकेकडून कब्रस्तान संघर्ष समितीला लेखी पत्र

0
182

पिंपरी, दि. २६(पीसीबी) – 21 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी कब्रस्तान संघर्ष समितीने केलेल्या तिरडी आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेतली. महापालिकेमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दफनभूमी विकसनाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे लेखी पत्र पालिकेच्या नगररचना विभागाने कब्रस्तान संघर्ष समितीला दिले.

समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालकीचे आयुक्त राजेश पाटील यांना कब्रस्तान संघर्ष समितीकडून कब्रस्तानच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. काळेवाडी ,थेरगाव ,वाकड परिसरात मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दफन करण्यासाठी जागाच नसल्याने मुस्लिम बांधवांच्या मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनची उदासीनता दिसत असल्याने महापालिकेवर तिरडी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते.

हाजी गुलजार ,मौलाना अलीम अन्सारी , कारि इकबाल , मौलाना इस्लामुद्दीन यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे , मारुती भापकर , इंटकचे कैलास कदम , सतीश काळे ,धनाजी येळकर , धम्मराज साळवे यांनी कब्रस्तानच्या मागणीसाठी समितीला पाठिंबा दिला.

समितीचे समनव्यक सिद्दीक शेख यांनी सांगितले कि, ”21 वर्षांपासून प्रलंबित कब्रस्तानचा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पालिकेकडून मिळालेले आहे. कब्रस्तानचा विषय आश्वासन दिल्याप्रमाणे जलदगतीने न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले जाईल. महापालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कब्रस्तानसाठी भूसंपादन करावयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून जमीन ताब्यात घेतल्यावर दफनभूमी विकसनाचे काम महापालिकेमार्फत करण्यात येईल”.